Saturday, August 1, 2020

"शाळा आणि शिक्षक” पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर या पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय

“शाळा आणि शिक्षक” पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय 
       पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर या पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय व या पुस्तकातील काही बाबी जे की माझा मनावर प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा मी लिखित स्वरूपात मा़ंडत आहे.           
 टिप:
      माझा या लिखाणात चुका व विसंगती आढळून आल्यास व माझे काही विचार आपल्या विचारांशी जुळत नसल्यास      ते माझे वैयक्तिक मत समजावे, याबद्दल क्षमस्व.
       मला आपली “शाळा आणि शिक्षक”   E-Book  वाचण्यास उपलब्ध करुन दिल्याबद्दल व माझे अभिप्राय मांडण्यास अनुमती दिल्याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.                  
आदरणीय,                                                                                                                                                         ना.सा सर आपल्या लिखाणाने मी खूप प्रभावित झालो. आपल्या लिखाणातून मला तूमची विद्यार्थाप्रती,समाजाप्रती असलेली निष्ठा, प्रेम, तळमळ, धडपड व सामाजिक बांधिलकी याची प्रचीती मला वेळोवळी दिसून आली. तुमच्या प्रत्येक लिखाणातून काहीना  काही मेसेज वाचकांना मिळत असतो, व ते शैक्षणिक सुधारणा बाबतीत असो वा सामाजिक जागृती असो आणि राष्ट्रभक्ती पर असो. तुमचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी विचारांचा एक खजिनाच असतो, वाचक वाचणात एवढे मग्न होतात की वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. तुमच्या या कर्तत्वाला माझा सलाम. तुमच्या या लिखाणाच्या कार्यातून भविष्यात असेच सामाजिक जागृती, सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक सुधारण्याचे कार्य घडत राहो त्याचबरोबर वाचकांना आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी व आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवता येईल व ते कसे टिकवून ठेवता येईल यासाठी असेच सदैव प्रेरणा वाचकांना मिळो. तुमच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा. 
       तुमचे हे कार्य व धडपड पाहून मला कधीकधी प्रश्न पडतो की आजकाल किती शिक्षक व सरकारी कर्मचारी आपली जबाबदारी अगदी कर्तव्यदक्षरित्या व प्रामाणिकपणे पार पाडतात ? अगदी फार कमी. आज प्रत्येकजण एवढा स्वार्थ बनत चालला आहे की अगोदर स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची सुधारणा लवकरात लवकर कशी होईल त्यासाठी भ्रष्ट मार्गाने आपली जबाबदारी विसरून कमीत कमी वेळेत पैसा कमवून मोठा कसा होता येईल हेच पाहत आहे. त्यामुळे पैसा, संपत्ती व वैयक्तिक स्वार्थ हेच सर्वश्रेष्ठ मानणारे हे मनुष्य मानवता, नीतिमत्ता व सामाजिक बांधिलकी या नीती तत्त्वापासून दुरावत चाललेला आहे. आणि पूर्णपणे असंवेदनशील बनत चालला आहे. परिणामी नात्यानात्यांमधील विश्वास, शिष्यांचा गुरुप्रती असलेला विश्वास, आई-वडिलांचा(वृद्ध) मुलाप्रती असलेला विश्वास, लोकांचा लोकांवरती असलेला विश्वास, विद्यार्थ्यांचा/ समाजाचा शिक्षणावरती असलेला विश्वास आणि समाजाचा सरकारवरती असलेला विश्वास हळूहळू कमी होत असताना दिसून येते.                                                                                                                                             प्रत्येकाने जर पैसा, संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ न मानता नीतिमत्ता, मानता व सामाजिक बांधिलकी याची जाण ठेवून आपापल्या क्षेत्रात अगदी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने काम केल्यास स्वतःला पैसा बरोबर आनंद व समाधान प्राप्त होऊन जीवन अधिक सुखी व आनंदी होईल. परिणामी स्वहित बरोबरच समाज आणि देशाचे हित व कल्याण होईल. आणि भारत एक विश्वसनीय राष्ट्र निर्माण होऊन सुजलाम-सुफलाम बनेल.
            आपल्या  “शाळा आणि शिक्षक” या पुस्तकातील खालील बाबी जे की मला खूप आवडले व माझ्या मनावर खूप प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा व त्यावर माझे काही वैयक्तिक मत या ठिकाणी मांडत आहे. 
१) कॉपी करणे करणे म्हणजे एक कलंक :
         खरोखरच कॉपी करणे म्हणजे एक कलंक व स्वतःच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा होय. नकला मारून पुढे  जाणे म्हणजे लोकांना आपली प्रगती वाटते परंतु ही प्रगती तात्पुरत्या स्वरुपाची असते. दीर्घकाळासाठी भविष्यात ही प्रगती अधोगती असते. तेच जर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने नकला न मारता पुढे गेलेला असेल तर त्याचा आत्मविश्वास प्रचंड असते. त्याचे निर्णयक्षमता भक्कम असते. व तोच स्पर्धेत टिकू शकतो व आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो.
        यासंदर्भात माझं स्वतःच एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. दहावी नंतर अकरावी सायन्स ला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस आमच्या काही गावाकडच्या सिनीअर्स मित्रांना बारावीत चांगले मार्क्स मिळाल्यामुळे  त्यांचा डीएड ला नंबर लागला होता. मला पण डीएड ला जायची खूप उत्सुकता होती. बारावी सायन्स असल्याकारणाने परिक्षेत थोड्याशा नकलांचा आधार जर मिळाला तर डीएड चे स्वप्न सहज पूर्ण होईल असे मला वाटत होतं. परंतु ऐन आमच्या बारावी परीक्षेच्या वेळेस नकला चालणे बंद झाल्यामुळे डीएड ला जायचे स्वप्न अपेक्षाभंग झाले. मी ७५ टक्के ची अपेक्षा केली असता केवळ मला ६३ टक्केच मिळाले. त्त्यावेळेस पहिल्यांदाच मी नशिबाला दोष देत खूप निराश झालो होतो. खूप काही आपण गमावलं व आपलं शैक्षणिक करिअर संपलं आता असे वाटत होतं. अशा निराश अवस्थेत मी डि.बी कॉलेज भोकर येथे ॲडमिशन घेतलो. डि.बी कॉलेज मध्ये बी.ए च्या प्रथम वर्षापासून माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली होती. चांगले अनुभवी प्राध्यापक व त्यांचे मार्गदर्शन आणि शिकवण, Strict Examination पद्धती,स्वतःची मेहनत व जिद्द या बळावर माझा आत्मविश्वास भक्कम होत गेली. डि.बी कॉलेज हे माझ्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे तर पुणे येथील पुढील शिक्षण  माझा सर्वांगीण विकास व यशात फार मोठा वाटा आहे.
        माझ्या जीवनात  जे काही यश-अपयश, जय-पराजय व वाईट प्रसंग आलेत ते चांगल्यासाठीच आलेत असे मला आज वाटते. त्यातून मला खूप काही शिकायला भेटले व माझे मन खूप खंबीर व जिद्दी बनले. आज मी जे यश संपादन केले त्याचे श्रेय हे मला भूतकाळात अपयशातून मिळालेल्या प्रेरणा यांस जातो.
२) आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण:
        आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण हे व्यक्तीच्या जीवनातील यशाच्या वाटेत फार मोलाचे आहे. जसे एकादा कारागीर एकादी वस्तू तयार करताना जसा आकार तो देत असतो तशी ती वस्तू आकार घेऊन बनत असते तसेच विद्यार्थी भविष्यात कसा आकार घेतो व कसा घडतो हे सुद्धा त्याला वेळोवेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मिळालेल्या महत्त्वपूर्ण वळणावरच अवलंबून असते. हे वळण त्याला आई-वडील, शिक्षक, मित्र, सभोवतालचे वातावरण यांच्याकडून मिळालेल्या संस्कार, आचार-विचार व शिक्षण यावर अवलंबून असते.

३) सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास:
        सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अवगत असलेले क्रीडा कौशल्य, कला कौशल्य दिसून येते. पण हे काही काळाकरता म्हणजे प्रजासत्ताक दिन सारख्या सोहळ्यानिमित्त मात्र ठरते. त्यानंतर त्यांना कोणीच प्रोत्साहन करीत नाही. शिक्षक व पालक जर खरोखरच विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेले हे कला कौशल्य व क्रीडा कौशल्य गुण ओळखून व त्या गुणांना वाव देऊन प्रोत्साहित करीत राहिले तर विद्यार्थी कमीत कमी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पर्यंत मजल मारू शकतात व आपली कर्तत्व सिद्ध करून दाखवतात. मी माझे असे काय मित्र पाहिले आहे की जे कलागुण संपन्न व क्रीडा गुण संपन्न असताना देखील प्रोत्साहन व मार्गदर्शन अभावी ते मागे राहिलेत. म्हणून शिक्षक, प्राध्यापक व पालक यांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खरोखरच एखाद्या विद्यार्थ्यांच्या अंगी तसे अवगत गुण असतील तर त्याला वाव देऊन त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहीत करावे अन्यथा टॅलेंट  नष्ट पावते व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा म्हणावं तेवढा विकास होणार नाही.
४) लोकसहभागातून शाळा विकास:
       आपण म्हटल्याप्रमाणे शाळेच्या विकास कार्यात जेवढी शिक्षकमंडळी, विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे तेवढीच गावातील लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. या विकासकार्यात या सर्वांचा सुरेख संगम असेल तरच शाळा नुसती शाळा नसून एक विश्वासाचं केंद्र निर्माण होईल. आणि चांगले प्रतिभावंत, गुणी व यशस्वी विद्यार्थी घडतील.
           ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शाळेच्या विकासात गावातील लोकांचा सहभाग हा निष्क्रिय असतो. काही शाळांमध्ये तर कित्येक वर्षानुवर्षे अपुरे शिक्षक, अपुऱ्या पायाभूत सुविधा ह्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. ही परिस्थिती असताना गावातील प्रतिष्ठित लोकं, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक याबाबतीत काहीच हालचाल व लक्ष करीत नाहीत. तसेच ही गावकरी मंडळी शाळेच्या संबंधित वेगवेगळ्या उपक्रमात देखील भाग घेत नाहीत. या सर्व गोष्टींस कारणीभूत आहे त्यांची मानसिकता, त्यांना वाटते  “ठेविले अनंते तैसेची रहावे”.  यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होते.
        हे बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. आजचा विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भावी आधारस्तंभ होय याची जाणीव प्रत्येकांना असायला हवी. शासनाने सुद्धा शाळेच्या विकासात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसे वाढवता येईल यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती घडवून आणले तर अधिक चांगले होईल.
५) लिहीण्याला पर्याय नाही:
          लोकांच्या मानसिक, आर्थिक व सामाजिक स्थितीत बदल घडवून आणायचे तर 'कलम व लिखाण’ यांची ताकद व महत्त्वाची भूमिका याबद्दल आपण मांडलेले विचार हे क्रांतिकारी, प्रभावकारक आणि मनाला  खूप स्पर्श करणारे आहेत. 
        तुमच्या पुस्तकात उल्लेखीत केलेले शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते युसुफजई यांचे संदर्भ व त्यांचे  वाक्य “मला पुस्तक व पेन द्या  मी जगात क्रांती घडवून आणीन” हे ह्रदयाला स्पर्श करणारे क्रांतीकारी विचार आहेत. यावरून मला पेनच्या ताकदीची कल्पना माझा डोक्यात आली.                                                                                                    या पेनच्या सामर्थाबद्दल मला इंग्रजीतले एक म्हण आठवत, “The  pen is mightier than the sword” याचा अर्थ “पेन तलवारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे”.  
 
६) शाळेला भिंती:
        शाळेला संरक्षण भिंत असले तर शाळेतील सुरक्षितता बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. तसेच विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात.  शाळेची सुरक्षितता राखणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. नुसत्या भिंती असून चालत नाही तर शिक्षक, मुख्याध्यापक व गावातील लोकांचा शाळाप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. शाळा विषयी आपुलकी व माझी शाळा ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. तरच शाळेचा परिसर व शांततेला भंग पोहोचू शकत नाही व शाळा खरोखरच सुरक्षित आहे आणि मुलं सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात असं म्हणता येईल.
७)एकच ध्यास ; वाचण्यास विकास:
          विद्यार्थ्यांचे भवितव्य हे त्यांनी विद्यार्थी जीवनात कमावलेल्या ज्ञानार्जनावर अवलंबून असते. हे ज्ञानार्जन त्यांनी वाचन,चिंतन व सराव यातून प्राप्त करीत असतो. 
       शालेय पुस्तकांच्या अभ्यासासोबत अवांतर वाचनाचे सवय किती महत्वाचे असते याबद्दल आपले विचार खूप परिणामकारक व प्रभावी आहेत. खरंच व्यक्ती अवांतर वाचन केल्यामुळे त्याला व्यवहार ज्ञान व वेगवेगळ्या थोर व्यक्तींचे  अनुभव शिकायला भेटते. या अनुभवातूनच व्यक्ती घडत असतो. 
       अलीकडे मुबाईल व टीव्ही या मिडीयाच्या प्रभावामुळे वरचेवर वाचन व वाचक मंडळी कमी होताना दिसून येते. यामुळे मुलं निर्बुद्ध , अविचारी व अकार्यक्षम बनत चालला आहे. ज्यांच्या घरी  मुलांना जेवढ्या जास्त luxurious (चैनीच्या) सुविधा मिळतात तेथे मुलं अभ्यासात आळशी व अकार्यक्षम बनताना दिसून येतात. याउलट जेथे सुविधांचा अभाव व गरिबी असते त्यांची मुलं अधिक होतकरू, हुशार निघतात. व ते जीवनात यशस्वी होतात. कारण त्यांना पर्याय नसतो. आपली जिद्द, मेहनत, धडपड व सराव या बळावर ते पुढे जात यश प्राप्त करतात. जर व्यक्ती परिस्थितीने कितीही गरीब असले तरी जर मनात प्रकट महत्वकांक्षा, जिद्द, मेहनत करण्याची वृत्ती असेल तर तो कितीही प्रतिकूल परिस्थितीत देखील आपला मार्ग शोधत असतो. म्हणूनच म्हणतात ना “गरज ही शोधाची जननी आहे” म्हणून. समाजात असे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात की, गरीब घरचे मुलं देखील आता चांगल्या मोठमोठ्या पदावर पोहोचत आहेत व जीवनात यश प्राप्त करत आहेत, याउलट श्रीमंतांची मुलं ज्यांच्या  येथे सुविधांचा वर्षाव असतो व त्यांना कोणत्याही बाबतीत काहीच कमतरता नसते अशी मुलं रस्त्यावर फिरताना दिसतात. म्हणून मुलांना जमेल तेवढे कमीत कमी luxurious(चैनीच्या) सुविधा व फाजील लाड करावे. सध्याच्या काळात यशस्वी होण्यासाठी short cut मार्ग कुठेच नाहीये, म्हणून त्यांना मेहनत व परिस्थतीची जाणीव करुन द्यायला हवे. त्यांना नुसत्या यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास देण्याऐवजी जर अपयशातून व शून्यातून वर येऊन यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास दिल्यास व त्यांचा आदर्श घालून दिल्यास बराच फरक पडू शकतो व ते प्रेरणादायी ठरते.

८) मुलांच्या प्रगतीसाठी:
        मुलांचे प्रगती व यश त्यांना मिळालेल्या योग्य वेळच्या योग्य मार्गदर्शनांवर अवलंबून असते. आपण पाहतो की ग्रामीण भागातील मुलं बऱ्याच वेळेस confused असतात की दहावी-बारावी नंतर काय करायच ? आपली क्षमता व कौशल्यानुसार क्षेत्र निवड न केल्यामुळे नंतर ते भविष्यात पश्चात्ताप करीत बसतात. तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहित केले तर तशी परिस्थिती उद्भवणार नाही. प्रत्येक वर्षी शाळेत दहावी - बारावी नंतर करिअर संदर्भात मार्गदर्शन व Seminar  चे आयोजन करावेत.
              आपण सांगितल्याप्रमाणे जर पालक स्वतःच्या मुलांच्या शिक्षण व करिअर बाबतीत जागरूक असेल तर त्यांची मुले नक्कीच हुशार व होतकरू निघतात हे वास्तव आहे. पण ग्रामीण भागात बहुतांश पालक या बाबतीत शून्य असतात. त्यांच मत असं बनलेलं असतं की शिकून कोणाला नोकऱ्या लागणार आहेत, ही नकारात्मक भावना मनात पक्की भरलेली असते. पण शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे याची त्याला काहीच जाणीव नसते. काही पालक तर आपल्या मुलांना सर्रासपणे शेतीच्या कामात राबवून घेतात. त्यामुळे मुलांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होऊन    link तुटत असते. मुलगा अर्ध्यावर शिक्षण सोडून गेले तरी त्यांना काहीच काळजी नसते. म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर गावातील शिक्षक, सुशिक्षित पालक व यशस्वी व्यक्ती यांनी मिळून सामूहिकतेने गावात शिक्षणविषयक जागृती निर्माण करायला हवी.  शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सामंजस (Mutual understanding) असायला हवे. शिक्षक आपले व्यक्तिमत्त्व, आचार-विचार हे आदर्श ठेवायला हवे. कारण बहुतांश वेळेस विद्यार्थी शिक्षकांचे गुण जसेच्या तसे अनुकरण व आचरणात आणीत असतात.

९) राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती:
        आपण मांडलेले “राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती” याविषयी विचार खूप प्रेरणादायी आहेत. सध्याच्या या धावपळीच्या युगातील परिस्थिती पाहता या विषयी अधिक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही  राष्ट्रभक्ती टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच व्यक्ती राष्ट्रभक्ती असल्याचा केवळ दिखावा न करता ते अंतकरणात व आचरणात आणली पाहिजे. देशातील प्रत्येक ठिकाणची सार्वजनिक सरकारी मालमत्ता ही माझी आहे ही भावना ठेवून त्यास कसल्याही प्रकारचे नुकसान पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी हवी. देशातील जनतेवर, जवानांवर(सैनिक), साधनसामुग्रीवरती, भूभागावरती सदैव प्रेम बाळगायला हवीत. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज चे मान-सन्मान राखायला हवी. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात न चुकता राष्ट्रगीत गायले जावेत. तरच खरी राष्ट्रभक्ती निर्माण होईल.

१०) शिक्षक आनंदी तर मुले आनंदी:
       आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षकांना जर त्यांच्या सोयीनुसार शाळा मिळाली तर त्यांचे अध्यापन देखील चांगले होऊ शकते हे बर्‍याच प्रमाणात खरे आहे. पण अल्ली ग्रामीण भागातल्या शाळेतील काही शिक्षकांकडे पाहता अशी परिस्थिती दिसून येते की, त्यांना शाळा अगदी घराजवळ असेल तर त्या संधीचा ते गैरवापर करतात. उदा. जसे की ते घराकडची कामे, शेती व इतर व्यवसाय बघत शाळा करतात. त्यामुळे वाचन व शाळेतील उपस्थिती कमी होऊन आपल्या शिकवणीतून म्हणावा तेवढा पूर्ण न्याय ते विद्यार्थ्यांना देऊ शकत नाहीत. तेच जर  अशा शिक्षकांना घरापासून दूरवर असलेल्या गावी बदली झाल्यास त्यांना शाळा शिवाय दुसरीकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही.

११) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने:
       याबाबतीत आपण सांगितलेले विचार मला खूप आवडले. खरंच, ज्ञान मिळवण्याचे ‘वाचन’ हे एक उत्तम साधन आहे. ज्याचे वाचन, चिंतन अधिक त्यांचे विचार, आत्मविश्वास व निर्णयक्षमता अधिक प्रभावी. असे असले तरी, किती वाचले यापेक्षा काय व कसे (किती आत्मसात केले)  वाचले हे महत्त्वाचे. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की, व्यक्ती या सोशल मीडियाला addict होऊन जास्तीत जास्त वेळ त्यावर तो खर्च करत आहे. या वाढत्या प्रभावामुळे वाचन, वाचक मंडळी, दर्जात्मक लिखाण फार कमी होत चाललेला आहे. हे सोशल मीडियाचे फार मोठे दुष्परिणाम व शोकांतिका आहे.
             अध्यापन प्रक्रिया जर पूर्णपणे ऑनलाईन झाल्यास शालेय व महाविद्यालयीन जीवनाला अतिशय खराब दिवस येतील असे मला वाटते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी उलट आळशी, अकार्यक्षम बनतील.
        सध्या शाळेतील ऑनलाइन संबंधित भेडसावणारी समस्या पाहता  या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत प्रशिक्षित संगणक शिक्षक पूर्णवेळ तत्त्वावर नेमावा. असे केल्याने तो शाळेला पूर्णवेळ देऊन अधिक मन लावून काम करेल.
        सध्याची देशाची परिस्थिती पाहता  ‘लोकसंख्या’ ही जलद गतीने वाढत असताना दिसून येते. ही लोकसंख्या वाढ म्हणजे देशाच्या विकासातील फार मोठी समस्या व त्रासदायक आहे. देशाची मर्यादित भूभाग क्षेत्र, मर्यादित साधनसामग्री, मर्यादित विकासाची साधने लक्षात घेता लोकसंख्या वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे. व ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

By:-

 S. M. Rachawad                                                   
 At post  Palaj.   Tq.Bhokar.  Dist.Nanded

No comments:

Post a Comment

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप जागतिक स्थिती थोडक्यात... 1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र): 1)...